ज्यांच्या राशन कार्डची नोंद नाही त्यांना दिलं जात आहे अन्नधान्य
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या सूतगिरणीवरील मजुरांनाही पुरवला भाजीपाला व अन्न धान्य
बीड (रिपोर्टर):- कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसह गोरगरिबांच्या प्रश्नावर संवेदनशील असलेले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून मतदारसंघातील सर्वच प्रश्नांकडे जातीने लक्ष दिले. आता लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने कामधंदा नसल्यामुळे अनेकांच्या घरात अन्नधान्य संपले असता अन्नदाता म्हणून बीडचा एकमेव लोकप्रतिनिधी गोरगरिबांच्या दारात जावून अन्नधान्याची अन् किराणा सामानचे वाटप करत आहे. बीड शहरासह ग्रामीण भागातील तब्बल दहा हजार कुटुंबियांना आ. संदीप क्षीरसागर अन्नधान्य वाटप करत असून आज राष्ट्रवादी भवनातून याचे वाटप सुरू केले आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सुतगिरणीवर काम करणार्या झारखंडमधील मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याची माहिती खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्फत मिळाल्यानंतर आ. संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांच्या सुतगिरणीवरील त्या कामगारांना, भाजीपाला, किराणा सामान वाटप केले. बीड जिल्ह्यात अन्य कुठल्याही लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांना अन्नधान्य वाटप केल्याचे अद्याप तरी दिसून आले नाही ते काम संदीप क्षीरसागरांनी केले.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दुसर्या टप्प्यात 3 मेपर्यंत देशात लोकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसह अन्य गोरगरीब लोकांना हाताला काम नसल्याने घरात चूल पेटवणं मुश्किल झाले आहे. परप्रांतातून अनेक मजूर बीड जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तसाच आ वासून उभा आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ईट येथील गजानन सुतगिरणीवर झारखंड येथून काम करण्यासाठी 50 ते 60 मजूर आलेले आहेत. ते लॉकडाऊनमध्ये अडकले असून त्यांच्याकडे खाण्यापिण्यासह अन्नधान्य नाही. याबाबत त्यातील काही मजुरांनी झारखंडमधील आपल्या परिवाराला याची माहिती दिली. परिवारातील लोकांनी स्थानिक खासदाराला याबाबत सांगीतले. त्या खासदाराने राष्ट्रवादी नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांना याबाबतची माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी बीड येथील लोकप्रतिनिधींना संबंधित मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याबाबत सूचना केली. अखेर काल आ. संदीप क्षीरसागरांनी या सर्व मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत त्याठिकाणी अन्नधान्य, भाजीपाला, किराणा सामान पाठवला. आज राष्ट्रवादी भवनातही आ. क्षीरसागरांनी हजारो लोकांना अन्नधान्य वाटपास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक कामधंदा नसल्याने त्रस्त होते. संदीप क्षीरसागरांनी अशा सर्वांना आधार दिला आहे. बीड जिल्ह्यातला पहिला लोकप्रतिनिधी आहे जो एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत आहे.
गोरगरीबांना भरवू घास, पूर्ण करू
मदतीचा ध्यास -संदीप क्षीरसागर
लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने बीड शहरासह ग्रामीण भागातील एकही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, याची जबाबदारी आपण स्वत: घेतली असून तालुक्यातील 10 हजारापेक्षा ऊसतोड मजूर, गोरगरीब, गरजवंतांना ज्यांच्याकडे राशनकार्ड नाही, अशा सर्वांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करत आहे. बीड तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे, आजपयर्ंंत आपण ज्या धैर्याने, संयमाने कोरोनाचा संकटाचा सामना केला तसाच सामना आणखी काही दिवस करा, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा.